लेंगीतील सौंदर्य दर्शन- चांदा जपजो.. रात आंधारी करजो... Episode 84
चांदा जपजो.. रात आंधारी करजो... (लेंगीतील सौंदर्य दर्शन) संदर्भ- मारोणी लेखक - भीमणीपुत्र मोहन गणुजी नायक----- सादरकर्ते- एकनाथ गोफणेे..व..दुर्गा गोफणेे... http://gorbolibanjararadio.com/ चांदा जपजो रात आंधारी करजो.. चांदा जपजो र.. चांदा छांयी चांदणी;चारोळीसी रात रे तू तो आजेरी रात रंजाण कर लं चांदा जपजो र..! छोरी म कुंवारी;पीत पीयारी रे म तो जोंऊ रे वाट पीयारी सारी रात चांदा जपजो र..! जपजो रे चांदा.. काळे बादलमा.. म तो छमछम घूगरा;वंजाऊ सारी रात चांदा जपजो र.. ! ! या लेंगीतील सौंदर्याचा आस्वाद घेताना लेंगी म्हणजे काय? हे समजून घेणे आवश्यक आहे."लेंगी ही वाङ्मय आणि कला क्षेत्रातील गोर बोलीभाषेचा एक अद्भुत असा मुक्त आविष्कार होय"ती श्लील आहे तर अश्लीलही आहे,तिच्या अश्लील स्वभावाच्या पाठीमागे मानववंश शास्त्रीय कारण आहे म्हणून तिला मर्यादा आहे.अभिजातवाद,स्वच्छंदता वाद,वास्तववाद या तिन्ही मूलभूत संकल्पना तिच्या पाठीमागे आहे म्हणून तिला 'रोमॅंटिसिझम'हेच पारिभाषिक नाव सार्थ ठरते. वसंत ऋतूत केसरी रंगाचा शालू लेवून,केसुलाच्या रानफुलाने माळलेल्या वेणीने नटलेल्या अशा वसुंधरेच्या सौंदर्याचा आणि चांदण्या रात्रीचा मनसोक्त आस्वाद घेत गोरमाटी मुक्त काव्य गाऊ लागतो,याच मुक्त काव्याला लेंगी म्हणतात.मुक्त लैंगिक जीवन पद्धतीत या लेंगी गीताचा उगम झाला. ही प्राचीन लेंगी अश्लील वाटत असली तरी तिच्यात अभिव्यक्तीचे नवे सामर्थ्य व भावसुचकता आहे.शब्दाचे लालित्य व नादमधुरता तर तिला सहज साधलेली आहे.लेंगी ही कल्पना विलासाचे सुमधुर भावविश्व म्हणून ओळखल्या जात असली तरी इतिहास,परिहास,मस्ती,विरह आणि प्रणयचेष्टा अशा विविध गुणाने नटलेली आहे.तिला आपले नैसर्गिक सौंदर्य आहे,तिचे सौंदर्य शब्दात मांडणे कठीण आहे. या लेंगीच्या शिवारात फिरताना आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी आतुरलेली व्याकुळ अशी गोर छोरी चांदोबाला विनवित असताना आपणास भेटते.'ये चांदोबा,आज माझा प्रियकर मला भेटायला येणार आहे रे.. तू थोडा ढगाआड लपून जा,तुझा प्रकाश आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्यावर पाड.चांदण्याच्या अंधुक प्रकाशाने रात्र चारोळीच्या रंगासारखी होईल आणि माझ्या प्रियकराला माझ्या पर्यंत सहज पोहोचता येईल.अशी या लेंगीची मध्यवर्ती संकल्पना आहे. प्रामाणिक प्रेयश भावनेचे चित्रण या लेंगीतून उमटलेले असून प्रियकराच्या भेटीसाठी आतुरलेल्या प्रेयश मनाची "चांदा जपजो र" ही विषयानुरूप भाषा ही वास्तव प्रेमाचा साक्षात्कार घडल्याचा अनुभव प्रकट करणारी आहे यात कुठेच कृत्रिमपणा आढळत नाही. या लेंगीतील 'चारोळीसी रात' ही उपमा अलंकारिक भाषाशैली तर गोर तरुणींच्या प्रतिभेची,काव्यदृष्टीची आणि कल्पकतेची जाणीव करून देणारी असून रसिक मनाला अंतर्मुख करणारी आहे. अस्सल अभिव्यक्ती ही पुस्तकी पांडित्यावर आधारलेली नसते तर ती प्रतिभेवर आधारलेली असते याचे एक उत्कृष्ट उदाहरण या लेंगी गीताच्या नायिकेने रसिकांपुढे ठेवले आहे. ही लेंगी ऐकताना या लेंगीचा आतला आवाज आपल्यासाठीच तर नाही ना? असा भास ऐकणाऱ्यास झाल्या शिवाय राहत नाही.विरहाचे येवढे प्रभावी आणि वास्तव चित्रण या लेंगी गीताच्या नायिकेने रेखाटलेले आहे म्हणून ही लेंगी प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. चांदोबाला आपली ओळख देताना या लेंगीच्या नायिकेने वापरलेली भाषा तर मनोरंजक आहे. ये चांदबा!मी प्रियकराची लाडकी प्रेयसी असून मी कुमारी छोरी आहे बरं का?हे विसरू नकोस.आपल्या इभ्रतीचा पंचनामा होऊ नये यासाठी ती अधिकारवाणीने चांदोबाला ढगाआड लपण्याविषयी सांगताना म्हणते.. छोरी म कुंवारी पित पियारी रे म तो जोंऊ रे वाट;पियारी सारी रात.. चांदा जपजो र..! प्रियकराच्या भेटीसाठी आतुरलेल्या व्याकुळ मनाचा उत्कट आविष्कार या ओळीतून उमटलेला आहे.अस्सल गोरमाटी बोलीभाषेचे आविष्कार जपणाऱ्या 'सी' (सारखी) आणि 'जोंऊ' (प्रतिक्षा) यासारख्या शब्दाने एक अप्रतिम असा सुंदर चेहरा या लेंगीला लाभलेला आहे. "म तो जोंऊ रे वाट,पियारी सारी रात' ही विरहाची व्याकुळता स्पष्ट करणारी भाषा तर सरळ काळजाला भिडणारी आहे. चांदा छांयी चांदणी;चारोळीसी रात या अलंकारिक भाषा शैलीने नटलेल्या ओळीतून या लेंगीच्या नायिकेने तर 'साहित्यात बोलीभाषा चालत नाही' या प्रस्थापित विचारसरणीच्या व्यवस्थेपुढे एक आव्हान उभे केलेले आहे.रसयुक्त रचनेने ठासून भरलेल्या अशा गोरमाटी बोलीभाषेतील मौखिक काव्याला Folklore या नावाखाली साहित्याच्या दालनातून हद्दपार करताच येणार नाही.या संदर्भात डॉ.विठ्ठल वाघ म्हणतात की,'जातीवंत सर्जनशील साहित्याची भाषा 'बोल' म्हणजे 'बोलीच'असते'गोरमाटी बोलीभाषा मौखिक साहित्य अभ्यासल्या नंतर याची वाचकास खात्री पटते. छमछम घूगरा वंजाऊ सारी रात या लेंगीतील 'छमछम घूगरा वंजाऊ सारी रात'ही नादानुकारी भाषा तर विरहाने व्याकुळ असलेल्या या लेंगीतील नायिकाकडे लक्ष्य केंद्रित करणारी असून 'वियोग शृंगार' रसाचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून या लेंगीतील या चरणाकडे बघता येईल. चांदोबा!आज माझा प्रियकर मला भेटायला येणार आहे रे,तेव्हा तू फक्त माझ्यासाठी आजची रात्र 'रजा'घे हे सांगण्यासाठी 'तू तो आजेरी रात रंजाण कर लं' अशा प्रकारे प्रेयसीने वापरेली ही प्रासादिक भाषाशैली रसिक मनाला अंतर्मुख करणारी आहे.प्रेमी युगुलांचे इतके सुंदर वियोग चित्रण या लेंगी गीताच्या नायिकेने साहित्याच्या दालनात टांगून ठेवले आहे. चांदोबा,प्रियकराच्या आठवणीने मी रात्रभर कुस बदलत असते त्यामुळे माझ्या पायातील पैजणाचे घुंगरू छमछम वाजत असतात.माझी ही वेदना,व्याकुळता फक्त तूच जाणतोस म्हणून मी तुला विनविते.. फक्त आजची रात्र तू माझ्यासाठी... चांदा जपजो र..! म तो जोंऊ रे वाट;पियारी सारी रात.. चांदा जपजो र.. गोरमाटी बोलीभाषा मौखिक साहित्य हे "लोकसाहित्य म्हणजे मूढ किंवा असंस्कृत लोकांचे ज्ञान'असे विद्वान अभ्यासकांनी इंग्रजी शब्दाच्या आधारे केलेल्या विवेचनाच्या बाहेर आहे.कृपया गोरमाटी बोलीभाषा मौखिक साहित्याला "फोकलोर"च्या पंगतीत बसविण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीही करू नये. मौखिक परंपरेने जगत आलेले गोरमाटी बोलीभाषा साहित्य हे एकेकाळच्या सुसंस्कृत आणि ज्ञानी अशा गोरगणा़च्या पुर्वजांनी केलेली ही निर्मिती म्हणजे अक्षर साहित्य होय. 'चांदा जपजो र..!'ही लेंगी सौंदर्याच्या बाबतीत कुठेच कमी पडत नाही.लेंगी हा एक सौंदर्य स्थळाने नटलेला स्वतंत्र असा भाषा शिवार होय या सौंदर्य स्थळाने नटलेल्या भाषा शिवारात फिरताना येणारी मजा काही और असते.'उहू!काळीकूट रात्र नको तर चारोळी सारखी रात्र मला हवी आहे' चारोळीसी रात ही लेंगीतून साकारलेली संकल्पना किती सुंदर आहे,नाही का?.. तांडा जीवन जगणाऱ्या प्रतिभावंत गोर छोरीची....!! संदर्भ- मारोणी - भीमणीपुत्र भीमणीपुत्र मोहन गणुजी नायक